मी फक्त ऐकत होतो…!

निवडणुकीची धामधूम संपली!! कार्यकर्त्यांचा जोश, उमेदवारांची दानशूरता, ५०% आरक्षणामुळे महिलांचा पहिल्याच वेळेस दिसलेला प्रचारातील सहभाग असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या
निवडणुकीत दिसून आले. एक मिनिट, निवडणुकीबद्दल तेच तेच ऐकून, वाचून बोर झाला असाल ना? घाबरू नका निवडणुकीचे विश्लेषण काही इथे मी लिहित नाहीये…

काही दिवसांपूर्वी मी एका नाटकासाठी राजकारणावर काही ओळी लिहिल्या होत्या… तुम्ही ‘झेंडा’ हा चित्रपट पहिला असेलच, यातील ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ हे परिणामकारक गाणे तर अत्यंत चपखलपणे या चित्रपटात वापरले आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा शेवटी दुर्लक्षितच राहतो, हाच निष्कर्ष अवधूतने या चित्रपटात मांडला आहे. ह्याच गाण्यातील मतीतार्थ घेऊन माझ्या ओळी सिद्धार्थ चांदेकर आणि संतोष जुवेकर या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या पात्रांच्या मनात सुरु असणाऱ्या घालमेलीला जोडता येतील… वाचून तर पहा…

——————————————————————————————-

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
पैश्यापुढे निर्भिडतेने हार मानली होती
ज्यांना दैवत मानले त्यांनी आज पाठ फिरवली होती
माझी बाजू ऐकून घेण्यास कोणी तयार नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
साहेबांच्या दारी लाचारीचे जगणे पत्करले होते
जणू स्वतःच्या तत्वांचा आणि विचारांचा गळा घोटला होता
वापरलो गेलो साधे हेही कळले नाही, मी फक्त ऐकत होतो…!

कधी वाटले होते भगत होऊन बेधडक घुसावे
तर कधी गांधी होऊन संयमी हत्यार उपसावे
करू काहीच शकलो नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते खेळाची मजा पाहत होते, आणि मी त्याच खेळातला प्यादा बनलो होतो
ते तरीही सांगत होते, आणि मी षंढ नुसताच ऐकत होतो…!