मी फक्त ऐकत होतो…!

निवडणुकीची धामधूम संपली!! कार्यकर्त्यांचा जोश, उमेदवारांची दानशूरता, ५०% आरक्षणामुळे महिलांचा पहिल्याच वेळेस दिसलेला प्रचारातील सहभाग असेच काहीसे चित्र नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या
निवडणुकीत दिसून आले. एक मिनिट, निवडणुकीबद्दल तेच तेच ऐकून, वाचून बोर झाला असाल ना? घाबरू नका निवडणुकीचे विश्लेषण काही इथे मी लिहित नाहीये…

काही दिवसांपूर्वी मी एका नाटकासाठी राजकारणावर काही ओळी लिहिल्या होत्या… तुम्ही ‘झेंडा’ हा चित्रपट पहिला असेलच, यातील ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती’ हे परिणामकारक गाणे तर अत्यंत चपखलपणे या चित्रपटात वापरले आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा शेवटी दुर्लक्षितच राहतो, हाच निष्कर्ष अवधूतने या चित्रपटात मांडला आहे. ह्याच गाण्यातील मतीतार्थ घेऊन माझ्या ओळी सिद्धार्थ चांदेकर आणि संतोष जुवेकर या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेत असणाऱ्या पात्रांच्या मनात सुरु असणाऱ्या घालमेलीला जोडता येतील… वाचून तर पहा…

——————————————————————————————-

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
पैश्यापुढे निर्भिडतेने हार मानली होती
ज्यांना दैवत मानले त्यांनी आज पाठ फिरवली होती
माझी बाजू ऐकून घेण्यास कोणी तयार नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते सांगत होते, आणि मी ऐकत होतो
साहेबांच्या दारी लाचारीचे जगणे पत्करले होते
जणू स्वतःच्या तत्वांचा आणि विचारांचा गळा घोटला होता
वापरलो गेलो साधे हेही कळले नाही, मी फक्त ऐकत होतो…!

कधी वाटले होते भगत होऊन बेधडक घुसावे
तर कधी गांधी होऊन संयमी हत्यार उपसावे
करू काहीच शकलो नाही, मी फक्त ऐकत होतो…!

ते खेळाची मजा पाहत होते, आणि मी त्याच खेळातला प्यादा बनलो होतो
ते तरीही सांगत होते, आणि मी षंढ नुसताच ऐकत होतो…!

जब निकलता हू मैं अपने घरसे

जब निकलता हू मैं अपने घरसे
मेरी आहटें तब पूछती है मुझसे
ऐ दोस्त मेरे, क्या करने चला है आज तू?
बस वही रुक पड़ते है मेरे कदम एक सोचसे,
क्या करे इस तबाही का हम!
क्यों सह ले भ्रष्ट लोगोंको हम!
क्यों ढूँढते है लोगों मैं बुराइयां हरदम
क्या खुद के घिरेबान में झाका कभी
छिपा लेते है जब अपनी गलतियाँ सभी
ना असलियत से दूर है हम
बस कहते है ”किस्मत के हाथों मजबूर है हम”
क्या मजबूरी, कैसी कमजोरी
इसी सोचसे तब घुटने लगता है दम
तभी एक आवाज़ पुकारती है हमे
सही सोच और राह दिखाती है हमे
उस सोच को पकडके चल पड़ते है हम
कुछ तो बदलाव जरुर लायेंगे ये थान लेते है हम
और तब दरवाज़े से निकलते है मेरे कदम….

तुम्ही पुण्यातले नाही वाटतं

17/1/2012, सकाळी 11.15 पुणे स्टेशनलगत असलेल्या ST Stand वरून वाकडेवाडी, शिवाजीनगर कडे येताना रिक्षावाल्यांचा आलेला अनुभव

जवळपास 5 ते 6 रिक्षावाले direct 90 रुपयाची मागणी करत असताना, मी मीटर प्रमाणे चला म्हणल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला… काहीजणांनी  आम्ही  वाकडेवाडीला जात नाही असेही सांगितले. वैतागून थोडे पुढे चालत आलो तर Traffic Police दिसला, त्यांना मी विचारले जर रिक्षावाले मीटर प्रमाणे येत नसतील  तर तक्रार कोणाकडे करायची?  यावर तो  म्हणाला  “आमच्याकडेच…कोण नाही म्हणतो मीटर प्रमाणे… तुम्ही बसा त्या रिक्षामध्ये आणि माझ्या इथे थांबवा मग आपण कारवाई करू”  मी माघारी फिरलो आणि परत रिक्षात बसलो, तेवढयात माझ्या मागोमाग पोलीस पण रिक्षाजवळ आला, आता मात्र रिक्षावाल्याची पंचाईत झाली, पोलिसाने licence जप्त कारवाईचा इशारा देताच तो “साहेब मी कुठे नाही म्हणालो मीटरप्रमाणे सोडायला…” 

चरफडत का होईना मला मीटर प्रमाणे सोडण्यास निघालेल्या रिक्षावाल्याची प्रवासात धुसफूस चालूच होती… मला म्हणाला “रोज किती लोक येतात इथे पण तुमच्या सारखं कोणी मीटर मीटर करत नाही, तुम्ही पुण्यातले नाही वाटत” मी मनात विचार केला  …बहुदा  ह्याला भेटलेले  पुणेकर एक तर फार  श्रीमंत  असतील नाहीतर फार घाईवर आलेले असतील…असो… प्रश्न राहिला मी पुणेकर आहे का नाही? तर…आमचे पूर्वज थेट शिवाजी महाराजांच्या काळापासून पुणे परिसरात वास्तव्यास होते, ह्या इतक्या सबळ विधानावरून नक्कीच मी पुण्यातलाच असणार.. नाही का? पुणेकर होण्यासाठी बहुदा हा नवीन निकष असावा कि रिक्षावाल्याकडे मीटर प्रमाणे चल असे न म्हणणे 😉 … पु.ल. देशपांडे यांनी पुणेकर होण्यासाठी काय करावे लागेल यावर आधीच जगाला हसवलंय… पण पु.ल. असते तर नक्कीच तेही  रिक्षावाल्याच्या या उक्तीवर हसले असते… 🙂 

…ह्या महाभागाला हे सर्व कोण समजावत बसणार So जास्त वादात न पडता (पुणेरी बाणा न दाखवता)वाकडेवाडी आल्यावर मीटर प्रमाणे झालेले 39 रुपये त्याचा हातावर टेकवले आणि माझ्या कामासाठी मी पुढे चालता झालो. कुठे 90 आणि कुठे 39 !! मात्र…गडबडीत त्या Traffic पोलिसाचे  नाव  विचारायला विसरलो… Really impressed with his prompt responce! 

त्याच दिवशी महाराष्ट्र टाइम्स मध्ये पुण्यातील मुजोर रिक्षावाल्यांवर लेख आला होता… त्यातील माहिती तुम्हाला पण उपयोगी पडेल http://goo.gl/HMajY

माझ्यासाठी कोण आहेस तू?

अथांग समुद्राचा निळाशार पसारा तू,
माझ्या जीवनाच्या कश्तीला मिळालेला किनारा तू… (उगीचच प्रेम वेडा बिडा)

हरभजन ने चुकून टाकलेला दुसरा तू,
नो बॉल वर विकेट घेणारा नेहरा तू… (कधी कधी चुकून मटका लागतो ना…)

खोलवर मनामध्ये साठवलेली आठवण तू,
त्याच आठवणींच्या गुंत्यात ठेवलस जखडून तू… (सस्पेन्स, गूढ किंवा रहस्यमय)

त्या रात्री मला पडलेलं सुंदर स्वप्न तू,
त्या स्वप्नाची कधीच संपू न वाटणारी रात्र तू…(परत प्रेम वेडा… नाही, सकाळी उठून कामावर जायचा घोर कंटाळा 😉 )

का अशी माझ्यापासून गेलीस दूर तू?
जगण्याचा आधारच जणू हिरावलास तू… (विरह 😦 )

खिन्न रात्री माझ्या अन उमेदीचे शब्द दिलेस तू,
आता कसा छान वाटतंय Thanks to you… (आनंदी आनंद चहूकडे 🙂 )

खवळलेल्या समुद्रावर स्वार होऊन मार्गस्थ जहाज तू,
तर कधी त्याच्या रौद्रावताराला भिक न घालता स्थितप्रज्ञ किनारा तू… (Balance Personality)

…….अनमोल

दुनोळ्या हा काव्यप्रकार दीपक परुळेकर याच्या ‘मनाचे बांधकाम’ या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा पाहिला आणि मग माझा पण एक प्रयत्न घुसडण्याचा 😉 वरील प्रयत्न केला…

फुल टू भारी दुनोळ्या येथे वाचा

नववर्षाभिनंदन 2012

 

सलाम सरत्या वर्षाला… 2011
दिलेस तू सामर्थ्य आणि विश्वास, तेव्हा लढलो आम्ही भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध
दिलीस विचारांची ताकद, तेव्हा ओळखू शकलो सरकारची अयोग्य नीती
दिलेस तू Social Network चे हत्यार, तेव्हा भाग पाडले आमची मते ऐकण्यास
दाखवलीस नवी दिशा, तेव्हा वाटले नक्कीच येणारे वर्ष घेऊन येईल उज्वल भवितव्य

 

स्वागत नव्या वर्षाचे… 2012
संघटीत होऊन समाजकार्यासाठी झोकून देण्यास युवाशक्ती आता सज्ज
भ्रष्टाचारमुक्त भारत आमच्यासाठी यापुढे स्वप्न नव्हे वास्तव
या लोकशाहीची जनता खरी मालक हि खुणगाठ बांधून पक्की
मतांचे मोल जाणून नव्या वर्षात खरया लोकनायकाची निवड आता नक्की

 

नवीन वर्ष तुम्हाला धमाल सुखाचे जावो… 🙂

Happy Birthday!! अनमोल…

पहिल्या वाढदिवसाच्या तुला मन:पूर्वक शुभेच्छा…!!

My Blog Birthday

अहो आज माझा ‘अनमोल’ एका वर्षाचा झाला ना. खरच खूप मस्त वाटतंय अभिनंदन करताना आणि स्वीकारताना. इथून मागे बघताना अस काही करू शकलो यावर विश्वासच बसत नाही. माझे शिक्षण तसे मराठी माध्यमातून झालेले, पण शालांत परीक्षेनंतर क्वचितच मराठी लिहिण्याचा संबंध आलेला. अशा परिस्थितीत मराठी मध्ये लेख, कविता लिहू शकेल याचा कधी विचारच केला नव्हता. शब्दांची  मोड तोड करून काहीतरी नवीन बनवता येते बस् एवढेच माहित होते पण जेव्हा ब्लॉग सुरु करण्याचा विचार झाला तेव्हा थोडासा लिखाणाबाबत गंभीर विचार करायला सुरवात केला. मागील एका वर्षात माझे मराठी थोडेसे सुधारण्याबरोबर, इतरांचे ब्लॉग वाचायची गोडी निर्माण झाली.. खरच पब्लिक किती भन्नाट लिहितात. या मागील प्रवासात माझ्या ब्लॉग ला प्रतिसाद देणाऱ्यांचे तसेच मला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्यांचे धन्यवाद…

तर आज तुम्हाला वाढदिवसाची पार्टी म्हणून  एक पोस्ट तर व्हायलाच पाहिजे… या नंतरची पोस्ट आज लगेचच पहा!

-अमोल देशपांडे (अनमोल)

कहीं दूर जब दिन ढल जाए

अण्णा ना dedicate हिंदीतून चारोळ्या

कहीं दूर जब दिन ढल जाए …
भ्रष्टाचारका अंधेरा हर तरफ फ़ैल जाए …
ना जाने कहिसे, आशा की किरन बन के वो आए …
आंधी कहो या चमत्कार, अन्ना तो हमें दुसरे गाँधी नज़र आए …!                                                                                                                                                                                                                  अनमोल…

स्पंदन… एक नवा ध्यास, नवे स्वप्न

हो स्पंदन चा पहिला ठोका पडला सुद्धा… तुम्ही ऐकला नाही का?
बरं…  थोडक्यात सांगतो… ‘स्पंदन‘ ह्या नावाखाली आम्हा मित्रांनी काही तरी विधायक कामे  करण्याचे ठरवले आहे. त्याचीच सुरवात म्हणून १७ जुलै २०११ रोजी आम्ही आमच्या शाळेत (ज्ञान प्रबोधिनी, निगडी) आमच्या निवृत्त शिक्षकांचा कृतज्ञता सत्कार आणि शाळेच्याच जैव-तंत्रज्ञान प्रकल्पाला छोटीशी भेट देऊ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या पार पडला त्याबद्दल सर्व मित्रांचे आभार, सर्वांच्या परिश्रमातून नियोजनातून सुरवात तर चांगली झाली आता पुढे…
स्पंदन म्हणजे काय? केलेला काव्यात्मक स्पष्टीकरणाचा प्रयत्न…
स्पंदन… एक नवा ध्यास … नवे स्वप्न 
स्पंदन म्हणजे मातीशी जोडणारी नाळ
स्पंदन म्हणजे विश्वास आणि मैत्रीतला दुवा
स्पंदन म्हणजे निसर्गाशी जोडलेले नाते
स्पंदन म्हणजे समाजसेवेची गवसलेली दिशा
स्पंदन…  एक यज्ञ … एक पर्व
१७ जुलै २०११ ला पार पडलेला कार्यक्रम हा गौरी पाठक (आमच्याच शाळेतली विद्यार्थिनी)  हिच्या त्रितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केला होता. तिच्यामुळेच खर तर आम्हाला अस काही करू शकू याची प्रेरणा मिळाली.  तिच्या विषयी काही तरी लिहायचे होते, ४-५ दिवस प्रयत्न करत होतो पण शब्दांची आणि आशयाची जुळवाजुळव काय होत नव्हती. अखेर ओळी सुचल्या त्या अश्या…
सांजवेळी मावळताना सूर्याने ठेविला अंधार मागे
बरसताना जलधारा उरे रिक्त आकाश मागे
अश्याच जाण्याने तुझ्या राहिल्या त्या आठवणी मागे
 
अंधारही सरेल आता नव्या दिवसाच्या स्वागतासाठी
रिक्त आकाशही भरेल उद्या पुनश्च बरसण्यासाठी
म्हणूनच आठवणी जागवूया,
आठवणीत राहील अश्या कामाला सुरवात करण्यासाठी   
स्पंदन विषयी सविस्तर माहितीसाठी इथे facebook.com/spandan.pratishthan टिचकी मारा.

पुणे-सोलापूर हायवे

पुणे – औरंगाबाद  | 10 मे 2010, सकाळी 7 वाजता
प्रोजेक्ट निमित्त क्लायन्ट साईट ला औरंगाबाद  ला जाण्यासाठी शिवाजीनगर बस स्थानकात शिवनेरीत बसलो…आणि अहो आश्चर्यं 10 वाजून 45 मिनटाला बाबा पेट्रोल पंप, औरंगाबाद ला पोहोचलो सुद्धा आणि  पुढच्या  15 मिनटात क्लायन्ट च्या ऑफिस मध्ये हजेरी
एक सुखद धक्का बसला होता…

सांगली – पुणे | 14 नोव्हेंबर 2010, संध्याकाळी 6 वाजता
सांगली वरून पुण्याकडे प्रयाण केले, अंतर तेवढेच अंदाजे 200 km तेही 4 तासात पार झाले
वा वा credit goes to महाराष्ट्र शासन…

असाच  चांगला अनुभव पुणे – नाशिक प्रवासात पण आला होता… पुणे – मुंबई प्रवास तर अगदी पलक झपकतेही … दादर वरून निगडी ला केवळ 2 तास 20 मिनटात… Great!!

महाराष्ट्र सरकारचा विजय असो!!

————————————————————————————————-

असू देत असू देत… जास्त स्तुती सुमने आम्ही खपवून नाही घेणार समजलं… आम्हाला मुळी त्याची सवय नाही… झाली काही कामे (तुमच्या दृष्टीने चांगली) आमच्या हातातून चुकून म्हणजे आम्ही सतत तुमचेच ऐकावे  का?

अहो पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याचे आजकाल फॅडच आले आहे. गुळगुळीत रस्ते,  म्हणे पोटातले पाणी हलणार नाही छॅ… अहो थोडेफार खड्डे हे हवेच अंगाचा व्यायाम होत नाही का त्याने…. कशाला हवेत ते उड्डाणपूल  आणि Service  road, चौपदरी रस्ते … उगीच वायफळ  खर्च … Traffic मुळे खोळंबा नाही हे  योग्य आहे का?… लांबच लांब गाड्यांची लागणारी रांग काय तुम्हाला बघवत नाही?… किती मजा असते त्यात… याच  खोळंब्यामुळे   आमचे Truck वाले बंधू वैचारिक देवाण घेवाण करू शकतात…

आपली ही रोड संस्कृती’ जपण्याचा आणि संवर्धनाचा आमचा मनोनिग्रह आहे…इतर रस्ते तर आमच्या हातातून सुटले आहेत पण ‘पुणे – सोलापूर हायवे’ साठी आम्ही निकराचा लढा देऊ
तद बद्दल आमचे  काही प्रामाणिक प्रयत्न :

1. ठिक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे (आमच्या इच्छेविरुद्ध) अतिशय संथ गतीने सुरु ठेवून… आम्ही Driver चे कौशल्य वाढवण्यावर भर देत आहे.. जेणेकरून पुणे – सोलापूर  हायवे वर चालवणारा माणूस जगात नाही तर  विश्वाच्या पाठीवर कुठेही चालवू शकतो…आणि हे शक्य आहे यावर आमचा विश्वास आहे
आमच्या सूत्रांनी चंद्रावरील खडबडीत भागाचे फोटो पाहिलेले आहे त्यामुळे तसाच अनुभव येथे मिळण्यासाठी इंदापूर नजीकचा टप्पा आमच्या विचाराधीन आहे.

2. National Highway 9 असा मान आम्हाला आहे … म्हणून काय रेल्वेशी आम्ही वाकड्यात शिरू काय?… अहो रेल्वे ची एकच लाईन आहे त्या टेमभूर्णी जवळ .. उगीचच त्यावर उड्डाणपूल टाकून त्यांचा अपमान करण्यास आम्ही तयार नाही

3. “पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश चालवा” अश्या आशयाची किमान 1000 फलक नुकतेच बनवायला टाकले आहेत पण आमची यावर एक नामी युक्ती आहे. 1000 फलका ऐवजी एकच मोठा फलक बनवून टाकू  “पुणे-सोलापूर हायवे सरसकट अपघात प्रवण क्षेत्र आहे तरी वाहने सावकाश चालवा”… खर्चात पण बचत होईल त्याने आणि सारखा तोच तोच संदेश वाचून प्रवासी कंटाळणार नाही

पण काय करणार… काही नतद्रश्तानी बहुमताने पुणे-सोलापूर हायवे चौपदरी करण्याचा ठराव मंजूर करून घेतला आहे. हा  हायवे सुद्धा आमच्या कडून सुटणार कि काय अशी भीती वाटते… तरी जितका उशीर करता येईल तितका करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाकी परमेश्वर बघून घेईल.

————————————————————————————————-

पुणे-सोलापूर हायवे | 29 मे 2011 वेळ सकाळी 7 वाजता
सोलापूर च्या आधी 30 km वर असणाऱ्या मोहोळ ह्या गावी मित्राच्या साखरपुड्याला पोहोचायला चक्क 7.30 तास लागले अंतर तेवढेच 210 km
अरे बाप रे काय डेनजर प्रवास होता तो… का सरकार ह्याच हायवे बद्दल इतके उदासीन आहे ??

देवा, कुमार सुशीलांचे विमान पंक्चर होऊ देत आणि त्यांना सोलापूर हायवे चा दिव्य प्रवास घडू देत… नाहीतरी त्याच हायवे वर एक फलक दर्शवितो … ‘दिल्ली -> 1710 km

एका निवांत क्षणी…

मावळतीचे रंग मनोहारी लेवून दिशांचा हा साज
तो पहा निघालाय रवी जणू दिवस बुडवायला आज
वाऱ्याबरोबर वाहत आहे गंधारलेली गंधता
कुठून बरे येई गुरांची किणकिणणारी नादमयता?
सभोवताल भासे जणू हिरव्या हिरव्या गालीचासम
आणिक डौलात झुलणारे रानफुले जणू माणिक मोत्यांसम  
 
ना तो गोंगाट  भोवती ना कोणाची घाईगर्दी
इथे खुद्द लोलकानेही विसरावी गती स्वतःची
तिथे भौतिक परिसिमेत बंदिस्त आहे वाऱ्याचे  अस्तित्व
इथे मात्र मुक्तपणे संचार हाच जणू याचा धर्म 
 
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
झरझर कापत रस्ता, त्या वळणावर गाडी अमुची सुसाट
वेळ आहे आता अंधाराच्या कवेत शिरण्याची,
अन् निशब्द शांतता अनुभवण्याची……
 
एका निवांत क्षणी असच काहीसं सुचलेलं…
 
अनमोल…