नाते आपुल्या दोघांचे…

सौख्य प्रीतीचे,
बंध रेशमाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!

जणू आकाशाचा निळाशार पसारा,
जणू नदीचा शांत किनारा,
जणू काजळाची गर्द छाया,
जणू धुक्यात हरवलेल्या वाटा,
चाहुली ह्या अश्या कित्येक, आज भासवी मला

भावना अश्या ओथंबलेल्या…
जिव्हाळाच्या त्या निवांत क्षणी…
स्पर्शाने चिंब भिजलेल्या…
वाटेवरील त्या कोमल आठवणी…
जपावे चिरकाल हे सारे, मन म्हणाले मला

हृदयातील सप्त सुरांचे,  
मन-मनातील  भावविश्वाचे,
नाते आपुल्या दोघांचे
आज अवघे युगा युगांचे!

अनमोल…

ते फूल होते एकटे

ते फूल होते एकटे
कड्या कपारी मध्ये उभे ठाकलेले
रुक्ष सम वनात डौलात झुलणारे…ते फूल होते एकटे
झेलत लहरी पावसाच्या
वारयाशीही दोन हात करणारे…ते फूल होते एकटे
बघताच मन प्रफुल्ल करणारे
नव्या उमेदीची झालर देणारे…ते फूल होते एकटे
अखंड प्रयास रुक्षता मिटवण्याचा
पण चुणूक त्यास असंभवतेची
कारण मित्रा…ते फूल अजूनही आहे एकटेच…!
अनमोल…
————————————————————————————————————————————————————-
[कवितेच्या माध्यमातून समाज सेवकाची जीवन गाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, अर्थात कवितेची ही चार कडवी समाज सेवकाच्या  व्यापक कार्यक्षेत्राला सामावू शकत नाही. माझे भाग्य आणि  आनंद  इतकाच की केलेली पहिलीच कविता ही  ‘समाजसेवा’ या विषयाशी निगडीत आहे. काही कारणास्तव कविता उशिराने प्रकाशित  करत  आहे]
सारांश…
कडवे १: समाज सेवकाचे  समाजामधील  स्थान,  स्थान म्हणाल तर अतिशय दुर्गम.
कडवे २: त्याच्या  वाट्याला  आलेली  प्रतिकूल  परिस्थिती  आणि  अश्यातही परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याच्या अंगात असलेली उर्मी. तग धरून राहिल्यानेच हा इतरांसाठी मार्गदर्शक बनू  शकला.
कडवे ३: नवी उमेद, नवी आशा, जगण्यातील आनंद अश्या कित्येक गोष्टी हा इतरांना वाटत असतो.
कडवे ४: शेवटी मला ठळक पणे  नमूद करावेसे वाटते कि भोवतालची परिस्थिती बदलायला निघालेला, द्रुढ निश्चयी असणारा, अडचणींना  न  जुमानणारा असा  हा इथे मात्र हतबल होतो  कारण आज तो एकटाच झगडतो आहे आणि समोर कामाचा व्याप प्रचंड आहे.
मित्रा असे संबोधून तो तुमच्याजवळ अत्यंत कळकळीने विनंती करतो आहे “सहभागी व्हा…साथ द्या…!”  “Join us…Support us…!”
————————————————————————————————————————————————————-

कैफियत

पुन्हा मन विचारांच्या गर्द डोहात झेपावले…
अन् नात्यांचे न सुटणारे कोडे उलगडू लागले…

हळू हळू शिरकाऊ पाहत आहे इथे राजकारण
का असत्यालाच दिले जात आहे महत्व अकारण?

चाली वर चाली, अहो आहे का हो हि राजनीती
चोराला सोडून संन्याशाला फाशी हि कैसी नीती?

शून्य आहे यांच्याकडे विचारांची परिपक्वता
मग उगीचच मोठे असल्याचे बिरूद कशाला मिरवता?

वंदितो अवघा समाज, कारण तयाचे परोपकार
त्यांनाच यावी उपेक्षा वाटयाला, हेच मुळी कसे पटणार?

वाटले होते आत्ताच कुठे सुरु झाले आनंदपर्व
पण का बरे खो घालण्यास तयार आहेत हे सर्व?

काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची
काही जन्मो जन्मीची, तर काही सुख-दुखाची
हे सारं अगदी खरय ना?
मग देवा कोडे न सुटण्याचे एक तरी कारण दे ना…                                                                              

अनमोल…