महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

आठवत नाही नक्की कधी आईने (सुनिता देशपांडे) समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले, मी नववीत होतो 1999 साली तेव्हाचे आठवते कामशेतला जाऊन आई खेड्यातील परिस्थितीने गरीब मुलींसाठी फर टॉंईजचे क्लास घेत होती, माझ्या लहान भावाला जसे कळायला लागले तेव्हा चूल-मुल यातून बाहेर पडत आईने तिची आवड आणि आकांक्षा जपण्याचा निर्धार करत फरची खेळणी बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले, आत्मसात केलेले कौशल्य फक्त अर्थार्जनासाठी उपयोगात आणण्याचे आईने करून पाहिले पण मुळातच फक्त पैसा कमवणे हा विचार तिला कधी पटलाच नव्हता, आपले कौशल्य समाजातील गरजू महिलांना बहाल करण्याचा तेव्हापासून तिने जो सपाटा लावला तो आजही तसाच आणि सुरवातीपेक्षाहि अधिक व्यापक स्वरुपात सुरु आहे.

happy women's day

लोणावळ्याजवळच्या कामशेत या गावात क्लास घेताना इकीकडे संसार आणि आवड याचा ताळमेळ घालताना तिची तारेवरची कसरत होत होती, पण जिद्दीने तिने दुर्गम भागातील 100 मुलींना शहरात सहज मिळू शकेल अश्या कलेत पारंगत केले, जेव्हा तिथल्या मुलींचा फोन आईला यायचा त्यात मुलींच्या संसाराला आईने शिकवलेल्या गोष्टींचा हातभार लागतो आहे हे कानावर पडायचे त्याचा सगळ्यात जास्त आनंद तिला होत असणार ह्यात शंका नाही. सुरवातीस काहीसा विरोध नंतर प्रोत्साहन आणि सध्या अनेक कामांमध्ये मदतही अशी बाबांची आईच्या या कार्यातील भूमिका इथे मांडणे महत्वाचे वाटते. कामशेतनंतर तिने घरी अनेक क्लासेस घेतले, मी कॉलेजमध्ये असताना आणि व्यवहाराची थोडी अक्कल आलेली असताना आईला अनेकवेळा हे बोलल्याचे आठवते कि तू इतरांसारखी क्लासेसची फी का वाढवत नाही, यावर ती म्हणायची अरे या महिलांची परिस्थिती बघ, घरच्यांचा विरोध असताना त्यांना त्यांची आवड जपायची आहे आणि जास्त फी ठेवली तर घरचे त्यांना पाठवणारच नाही, मी चिडायचो तेव्हा, पण आज कळते कि पैसे जोडण्यापेक्षा माणसे जोडणे किती महत्वाचे आहे.

2004 साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण क्लासेस घेणे सुरु केले. एव्हाना फर टॉंईजपासून सुरवात करून आईने फळ प्रक्रिया, ज्वेलरी, क्राफ्टची फुले, डेकोरेशन, रुखवत सजावट, सेंट अत्तर, इत्यादी दहाच्यावर कौशल्ये आत्मसात केली होती. साहजिकच पालिकेच्या या उपक्रमात आईने हिरीरीने भाग घेतला, गेली 9 वर्षे आई ह्या उपक्रमात प्रशिक्षक म्हणून सहभागी आहे, क्लासेससाठी पिंपरी-चिंचवडचा सर्व भाग तिने पालथा घातला. या कालावधीत तब्बल 1000 पेक्षा जास्त महिलांना प्रशिक्षण आईने दिले. या प्रशिक्षण काळात तिला चांगले तसेच काही वाईट अनुभवही आले. 2010 साली प्रशिक्षण योजनेचे कंत्राट देण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय’ संस्थेने आईसोबत अनेक महिला प्रशिक्षकांचे मानधन रखडवले होते, 2 वर्षे उलटूनही जेव्हा संस्थेने मानधन देण्याबाबत टाळाटाळ केली तेव्हा तिने जिद्दीने त्याविरोधात संघर्ष केला, माहिती अधिकार तसेच पालिकेचा लोकशाही दिन या मार्गांचा वापर करत तिने पालिकेच्या अधिकाऱ्यांना महिला प्रशिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली. तिच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी संस्थेला निर्देश दिले कि जोपर्यंत प्रशिक्षकांचे मानधन मिळत नाही तोपर्यंत सदर संस्थेच्या पुढच्या कोणत्याही कंत्राटावर सही मिळणार नाही. चेक मेट झालेल्या संस्थेला आईसमवेत अनेक महिलांचे मानधन द्यावेच लागले. तुमचे एकट्याचे काम करतो बाकी महिलांचे नंतर पाहू अशी संस्थेकडून आलेली ऑफर धुडकावून स्वतःबरोबर तिने तिच्या सहयोगी महिलांचे काम फत्ते केले… स्वतःच्या कष्टाचा आणि नियमाने मिळत असलेल्या मानधनावर का बरे पाणी सोडायचे हा या धडपडीमागाचा मूळ उद्देश.

2011 साली निगडी-प्राधिकरण परिसरात 7 बचत गटांची सुरवात करण्यात तिने पुढाकार घेतला. अनेक बचत गट सुरु करण्यासाठी मार्गदर्शन केले. बचत गटांमार्फत छोट्या छोट्या सामाजिक कार्यात भाग घेणे सुरु केले. परंतु बचत गट स्थापनेमागील मुख्य उद्देश तिला साध्य करता येत नव्हता. गरजू महिलांना रोजगार कसा मिळवून देऊ शकतो ह्याने तिला पछाडले होते. सुयश महिला बचत गटामार्फत तिने तिच्या महत्वाकांक्षेला लवकरच गवसणी घातली.

2012 साली आईने तिची भावजय (संध्या कर्णिक) आणि पुतणी (शीतल रणदिवे) यांच्यासोबत ‘सुयश’ महिला बचत गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना घराच्याजवळ रोजगार उपलब्ध करण्यासाठी लघु उद्योगाची सुरवात जुलै 2012 मध्ये निगडी-प्राधिकरण येथे करण्यात आली. कमी श्रमाचे आणि कमी जोखमीचे काम पिंपरी-चिंचवडमधील एका नामवंत कंपनीकडून सुयश बचत गटाला मिळाले. आजमितीस 30 महिलांना यातून रोजगार मिळतो आहे. विधवा, घरची परिस्थिती बिकट असलेल्या अनेक महिलांना आशेचा नवा किरण यामुळे मिळाला. या उद्योगात नियोजन, विक्री, मार्केटिंग या सर्व आघाड्या आईसमवेत मामी आणि बहिण अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसत आहे

सुयशबद्दल काही ठळक मुद्दे सांगायचे झाल्यास…

  • सुयश बचत गटाने उद्योगाची सुरवात करताना कोणतेही अनुदान घेतले नव्हते
  • बचत गटाच्या कामाची प्रगती पाहून स्वतः भगिनी निवेदिता बँकेच्या व्यवस्थापक आईला भेटल्या त्यांनी महिलांचे कौतुक केले, पगारासाठी सर्व महिलांचे बँक खाते उघडून सर्वांना डेबिट कार्ड देण्याची कल्पना त्यांनी आईजवळ मांडली, महिलांसाठी फायद्याच्या ह्या विनंतीला आईने लागलीच दुजोरा दिला त्यामुळे महिलांना २०१३ मार्चपासून पगार बँकेमार्फत मिळणे सुरु होईल.
  • पिंपरी-चिंचवड मधील ज्या कंपनीकडून काम मिळाले तिथे सद्यस्थितीत कंपनीच्या कामगारांपेक्षा सुयश महिलांच्या कामाचा दर्जा हा अधिक चांगला दिसून आला. चांगली गुणवत्ता आणि कामाचा उच्च दर्जा राखल्याबद्द्दल कंपनीच्या व्यवस्थापकांनी गटाचे कौतुक केले

सुयशमध्ये दैनंदिन कामाचे स्वरूप हे इतर उद्योगांपेक्षा वेगळे असते. महिलांकडून श्री सुप्त आणि इतर श्लोकांचे पठण रोजच्या रोज आई कटाक्षाने करून घेते, प्रसंगी एखादा चांगला लेख, माहिती त्यांना आवर्जून सांगितली जाते. वाढदिवस, महिलांचे पारंपारिक सण साजरा करणे यातून येथील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे असते. महिलानाम् उत्कर्षार्थम् कटिबद्धा: महिलांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध या आशयाची संकृतमधील ओळ आज सुयशच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला सार्थ ठरवणारी आहे.

माझ्या मते महिलांना रोजगार मिळवून देणे,त्यांना विविध कला शिकवणे यापेक्षाही मोठे काम आई करत आहे ते म्हणजे या सर्व महिलांना समाजात आत्मविश्वासाने कसे जगावे याचे शिक्षण जणू आई तिच्या कामातून देत आहे. महिला दिनाच्या दिवशी याबद्दल काही लिहूयात असे आजच डोक्यात आले, कमी वेळात जितके आठवले तेवढे इथे लिहिले. अजून बरेच काही सांगण्यासारखे आहे ते पुन्हा कधीतरी इथेच अपडेट करेल. …धन्यवाद

तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार 
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार
कर्तुत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्रीशक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर

Suyash Namaste 1

3 thoughts on “महिला दिन विशेष – सुनिता देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s