आज्जीच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी रचलेल्या ओळी…
आभाळाएवढी उत्तुंग तुझी माया
परोपकाराचे दिलेस धडे आम्हाला
तुझ्या अगाध महिमेला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला
अल्लड मुलगी होतीस कधी, झालीस संसारदक्ष पत्नी तू
आईचे ममत्व अन् आज्जीचा बटवा लेवून शोभतेस बरी पणजी तू
तुझ्या यशस्वी वाटचालीला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला
परस्थिती होती बिकट जेव्हा आव्हानांचा डोंगर उभा
धीराने रचलास कुटुंबाचा एकसंध पाया तेव्हा
तुझ्या विलक्षण त्यागाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला
चिडलो रागावलो तुझ्यावर आम्ही जरी
दुरावले कधीच नाहीस तू अंतरी
तुझ्यातील ममतेच्या झऱ्याला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला
प्रत्येक गोष्टीवर तुझी चोख देखरेख असायची
हरवायची काही सोय त्यामुळे आम्हा नसायची
तुझ्या आज्जीदक्ष स्वभावाला…
सहस्त्र चंद्र आहेत साक्षीला
तुझ्याबद्दल सांगताना मज शब्द अपुरे पडले
चांदण्या रात्रीत माझे मलाच गहिवरून आले
मग हळूच मान वर करून चंद्राकडे पहिले
खर सांगतो आज्जी…
सहस्त्र दर्शनाने तुझ्या, त्याचे भारावलेले रूप मला दिसले!
आणि मग पोस्टरची कल्पना सुचली… फोटोचे डिझाईन माझेच फक्त Coral draw साठी एकाची मदत घेऊन प्रत्यक्षात उतरवले…