कधी कधी धकाधकीच्या जिवनातून जरा उसंत घेऊन थोडासा वेळ दुसरयांसाठी काढला की मनाला एक वेगळाच आनंद मिळून जातो, होय ना…? कृत्रिम हसणे सभोवताली नेहमीच बघतो पण निरागस, अल्लड हसणे काय असते याचा प्रत्यय मला नुकताच नांदिवली मध्ये आला. माझे गाव ‘नांदिवली’. पुण्यातून पौड रस्त्याने तसेच पिंपरी-चिंचवड मधून हिंजवडी मार्गाने माझ्या गावाला येता येते. अंदाजे ६० km अंतर असावे. थोडक्यात परिचय, नंतर कधीतरी नांदिवली, मुळशी विषयी बोलूच.
मुळशी परिसराचे काही विहंगम दृश्ये
आत्ता मला गप्पा मारायच्या आहेत त्या ९ जानेवारी २०११ रोजी पार पडलेल्या कार्यक्रमा विषयी:
हा दिवस म्हणजे आजोबांचा (अण्णा) जन्मदिवस तसेच ६ वर्षांपासून जयंती दिवस, याच दिवसाचे औचित्य साधून आणि गावाविषयी असलेल्या आजोबांच्या आत्मीयतेचा वसा पुढे चालवताना आम्ही देशपांडे कुटुंब शाळकरी मुलांना प्रोत्साहनपर साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आखतो.
वर्ष ६ वे:
गावामधील शाळा हि इयत्ता पाचवी पर्यंत भरली जाते. शाळा तशी लहान, सगळे विद्यार्थी मिळून १४ आणि एक गुरुजी. रविवार च्या दिवशी गुरुजी आणि ग्रामस्थांच्या मदतीने कार्यक्रम नियोजित वेळी सकाळी १० वाजता सुरु झाला. गुरुजींना कार्यक्रम मला कसा अपेक्षित आहे हे थोडक्यात सांगितले.
स्थळ- वर्गकक्षा, नांदिवली गाव
गुरुजींनी प्रास्ताविक दिल्यावर मुलांनी एका सुरात पद्याने कार्यक्रमाची सुरवात केली. गुरुजींनी पाहुणे आणि वरिष्ठ गावकरी मंडळींची ओळख करून दिली आणि मला दोन शब्द बोलण्याचा आग्रह केला. नवीन लोक समोर असल्याने मुले जरा बावरलेली दिसत होती. काय बरे बोलावे? नुसतेच मौलिक
सल्ले देण्यापेक्षा यांच्याशी जरा हलक्या फुलक्या गप्पा मारल्या तर नक्कीच मुले खुलतील.
मी: मुलांनो आता तुम्ही मला तुमचे नाव इयत्ता तसेच आवडीची एखादी गोष्ट सांगायची
मुले: (अजूनही बावरलेले)
मी: तू उभा रहा, नाव काय तुझं ? इयत्ता कुठली?
मुलगा: गणेश…अं… इयत्ता पहिली
मी: काय आवडते तुला?
मुलगा: (नुसताच हसून)
मी: एखादा पदार्थ, वस्तू, पक्षी, प्राणी काही पण जे आवडते ते सांग
तो: कावळा
इतर मंडळी: (खो खो हसून)
मी: …!! (मनात…कावळा का बरे? विचार करता असा अनुमान काढला की एकतर कावळ्यांची सभोवतालची असलेली विपुल उपलब्धता आणि घरोघरी असलेला समज की कावळा ओरडला म्हणजे पाहुणे येणार आणि मुलांसाठी पाहुणे म्हणजे खाऊ पर्यायाने आनंद…वा वा स्वतःलाच शाबासकी देत)
मी: तू सांग
ती: मला मेथी
तो: चिक्कू
तो: चिंच
मी: चिंच! चोरून खायला आवडते का? (…रम्य ते बालपण, …रम्य त्या केलेल्या पेरू, कैरी, आवळा आणि चिंचेच्या चोरया 😉 )
मी: मोठयाने बोल
तो: (दबक्या आवाजात) मला पण कावळा…
इतर मंडळी: (परत खो खो हसून)
ती: पालक
माझे बाबा: पालक म्हणजे भाजी की आई बाबा?
ती: भाजी…
इतर मंडळी: (फिदीफिदी हसून)
(अश्या प्रकारे सगळ्या मुलांची ओळख परेड पार पडली आणि बर का मुले एव्हाना समरस झाली होती.)
माझे छोटेखानी भाषण:
(इशारा: छोटेखानी भाषणाचे शब्दांकन हे अतीव छोटेखानी आहे त्यामुळे चिंता नसावी)
मी: “मुलांनो आज आपण इथे जमलो आहे ते माझ्या आजोबांच्या ६ व्या जयंती निमित्त. तुम्हाला प्रश्न पडला असेल की का बरे हे लोक दरवर्षी येतात आणि आपल्याला काहीतरी भेट देऊन जातात? ते केवळ तुम्ही शिकत आहात याला प्रोत्साहन मिळावे यासाठी. मुलांनो तुम्हाला माहित असेलच आपल्या गावाजवळ सहारा (Amby valley, २०-२५ km अंतरावर) नावाची मोठी कंपनी आहे. दहावी बारावी पास असाल तर तिथे तुम्हाला सहज नोकरी मिळते. या गावातील तुमच्या आधीच्या लोकांनी शिक्षण मधेच सोडले आणि सुवर्ण संधी गमावली (सत्य परिस्थिती). तुम्ही अशीच जर शिक्षणाची संगत ठेवली तर नक्कीच लोक तुम्हाला प्रोत्साहन म्हणून अधिक चांगल्या चांगल्या भेटवस्तू देतील (शिक्षणासाठी आमिष). तर मग, मुलांनो शिक्षणाची संगत कायम ठेवणार ना?”
मुले: होssss
साहित्य वाटप कार्यक्रम:
येथून पुढे मुख्य असा साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरु झाला. यंदा मुलांना स्वेटर, शालोपयोगी वस्तू आणि खाऊ म्हणून बिस्कीट अश्या जिनसा दिल्या.
इथे कार्यक्रमाची क्षणचित्रे पहा
गुरुजींनी मग माजी सरपंचांना बोलायची विनंती केली, त्यांचे बोलणे संपते ना संपते तोच उत्साहाच्या भरात समारोपाचे दोन शब्द बोलताना अचानक एक बॉंब टाकला…!! गुरुजी: (माझ्या वडिलांना निर्देशून) “काकांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम केला, मुलांनो उद्या तुमचेही वडील जाणार तेव्हा असाच कार्यक्रम तुम्ही सुद्धा करावा” (आम्ही सगळे अवाक आणि निरुत्तर #!@*^?)
|| इति श्री नांदिवली ग्रामे कथा समाप्त ||
[ता. क.: स्वेटर, साहित्य, खाऊ खरेदी तसेच आलेल्या पाहुण्यांची चहा नाश्त्याची सोय अश्या महत्वाच्या आघाडया आई बाबांनी सांभाळल्या. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे अश्या समाजोपयोगी कृतींना अधिकाधिक बळ मिळते]
“आजोबांच्या ६ व्या जयंती निमित्त” ? Something is wrong….
शोध घेता अशी माहिती मिळाली की जयंती हि, जन्मदिवसालाच संबोधली जाते फक्त त्याचा प्रयोग हा ती व्यक्ती जीवित नसेल तेव्हा होतो.